फुरसुंगी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांवर धारधार शास्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खंडोबा माळ परिसरातील हर्षदीप मेडीकलच्या समोर मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी लोणी काळभोर येथील एका तरुणासह चौघांना अटक केली आहे.
शुभम गोविंद गायकवाड (वय-१९, रा. सोमाई शाळेजवळ खंडोबा माळ, फुरसुंगी, ता. हवेली), नितीन धोंडिराम मोरे (वय २२, रा. खंडोबा माळाच्या पाठीमागे, फुरसुंगी, ता. हवेली), अनिरुद्ध महादेव मोरे (वय २०) व आकाश रामहरी हाजगुडे (वय २२, रा. मोगले वस्ती, कॅनॉलच्या जवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून पहिला वाद झाला होता. हा राग मनात धरून आरोपी फिर्यादी यांना धडा शिकविण्यासाठी सारखा पाठलाग करीत होते. दरम्यान, मंगळवारी फिर्यादी व त्यांचा मित्र खंडोबा माळ परिसरातील हर्षदीप मेडीकलच्या समोर चहा पिण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी धारदार हत्याराने डोक्यात वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वरील चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.