लोणी काळभोर, (पुणे) : मित्राची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील नव्या कॅनॉलजवळ रविवारी (ता. २५) संध्याकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद सुरेश काळभोर (वय २३, व्यवसाय शेती, पत्ता बाजार मळा, लोणी काळभोर ता. हवेली), हर्शद तुळशीराम काळे (वय-२३) अशी हाणामारीत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. तर प्रशांत तुकाराम काळभोर (वय ३५), सुजीत वलटे (वय ३०), सुरज पांडुरंग गवते (वय २३), विशाल काळभोर (वय ४०, सर्व रा. लोणीकाळभोर ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद काळभोर हे त्यांचा मित्र हर्षद काळे याला कोळपेवस्ती येथील घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून चालले होते. दोघेजण दुचाकीवरून जात असताना, रविवारी (ता.२५) सव्वासात वाजण्याच्या सुमारास नवा कॅनलजवळ, प्रसाद काळभोर यांना त्यांचा औदुंबर काळभोर व सुरज गवते यांचा रस्त्यालगत वाद सुरु होता. यावेळी सदर ठिकाणी आरोपी प्रशांत काळभोर, सुजीत वलटे, सुरज गवते, विशाल काळभोर हे सुध्दा थांबले होते.
दरम्यान, फिर्यादी प्रसाद काळभोर यांचा औदुंबर काळभोर हा मित्र असल्याने सदर ठिकाणी थांबुन काय झाले ? कशाला वाद करताय असे विचारले, तेव्हा आरोपी प्रशांत काळभोर हा म्हणाला, तुला काय करायच असे म्हणुन प्रसाद काळभोर शिवीगाळ करु लागला, तेंव्हा प्रसाद म्हणाला मी भांडणे सोडवण्यासाठी थांबालोय.
त्यानंतर आरोपी प्रशांत याने प्रसाद काळभोर याच्या तोंडावर लोखंडी हत्याराचे दांडयाने मारहाण केली. तेंव्हा मित्र हर्षद काळे भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आला असता, तेव्हा आरोपींनी हर्षदला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी प्रसाद काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन गायकवाड करत आहेत.