लोणी काळभोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाच्या वतीने होळकरवाडी (ता. हवेली) येथील १५८.१९ हेक्टरची नगर रचना योजना क्रमांक ४ व १३०.७८ हेक्टरची नगर रचना योजना क्रमांक ५ या दोन्ही प्राथमिक योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर केल्या आहेत, अशी माहिती पीएमआरडीए उप जिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे.
पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले आहे. पीएमआरडीएच्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी होळकरवाडी येथे दोनही नगर रचना योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्या आहेत.
त्यानंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद नगर रचनेचे सेवा निवृत्त सहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर केली आहे.
सुमारे २६०० खातेदार शेतकरी यांचे एकूण २८१.५० हेक्टर क्षेत्राचा व नाल्याचे ८.५२ हेक्टर आर क्षेत्राचा समावेश दोन्ही नगर रचना योजनामध्ये आहे. त्यामध्ये ५०% क्षेत्राचे म्हणजेच १४२.७५ हे.आर चे ३२० विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देनेत आले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी ३७.१७ हेक्टर क्षेत्राचे २७ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.
या योजना क्षेत्रात सुमारे १९.६१ हे आर क्षेत्र रिंगरोडसाठी व ३१.१९ हे आर क्षेत्र अंतर्गत रस्ते यासाठी तसेच मैदानांसाठी ५.५० हे.क्षेत्र चे १० भूखंड, बगीचा साठी १९.०० हेक्टर चे २८ भूखंड , बालोद्यानासाठी ३.९३ हे चे ४ भूखंड ,रिव्हर फ्रंट / ग्रीन बेल्ट साठी १३.६२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
या शिवाय नागरी सुविधांमध्ये २ प्राथमिक शाळा, २ प्राथमिक आरोग्य केंद्र, घन कचरा संकलन केंद्र ,रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, ३ भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, दोन सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, ४ शॉपिंग सेंटर, या साठी देखील एकूण १४.११ हे क्षेत्राचे २४ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.
या दोन्ही नगर रचना योजनेतून ६५ मी रुंदीच्या २.५७ कि मी रस्तासाठी लागणारे सुमारे १९.६१ हे.आर क्षेत्र ताब्यात येईल. तसेच या योजनेतून प्राधीकरणास १७.०४ हे क्षेत्राचे २५ भूखंड उपलब्ध होणार आहेत. सदरची योजनेचे लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी शासन राजपत्रात व दि. १३.२.२०२३ रोजीच्या दैनिक पुढारी, लोकमत, इंडिअन एक्स्प्रेस व टाईम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध केली आहे.