बोरी बुद्रुक : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक या गावात ग्रामस्थांना दररोज बिबट्याचं दर्शन होत आहे. हे गाव कुकडी नदीच्या तिरावर वसलंय. या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा मिळत आहे. दरम्यान, रोजच बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोरी बुद्रुक परिसरातील ऊस तोडणी अंतिम टप्प्यावर आली आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, बिबट्यांना खाद्य मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवर देखील हल्ले करू लागला आहे. या गावातील साईनगर मळ्यात दुचाकीस्वारांच्या मागे लागत असल्याने येथील नागरिक अतिशय भीतीने या ठिकाणाहून ये-जा करत आहेत.
तसेच दोन दिवसांपूर्वी येथील एका दुकानदाराचा बिबट्याने पाठलाग केला होता. हा दुकानदार दुकान बंद करून घरी जात होता. तेव्हा रस्त्यावरच असलेल्या ऊसाच्या शेतातून अचानकपणे आलेल्या बिबट्याने त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याची गाडी वेगात असल्याने गाडीवरून खाली पडल्यानंतर त्याने मोठ्याने आरडाओरड केली. तेव्हा बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला.
पिंजरा लावण्याची केली जातीये मागणी
या परिसरात बिबट्याची दहशत वाढतच आहे. वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे यांनी केली.