हडपसर : श्रीमंत व्यक्ती हीटर लावून थंडीपासून संरक्षण करतात, तर सर्वसामान्य व्यक्ती थंडीत उबदार कपडे घालतात. मात्र, अनाथ, वंचितगोर-गरीब व्यक्तींना पोटाची खळगी भरतानाच अनंत अडचण येतात, त्यांनी थंडीपासून संरक्षण कसे करायचे? गरम कपडे कसे खरेदी करायचे? अशा वंचितांना आधार देण्यासाठी स्मितसेवा फाउंडेशन व विश्वसावली फाउंडेशन पुढे सरसावले आहे. त्यांनी हडपसर परिसरातील गोर-गरिबांना मोफत ब्लॅंकेट वाटप करून मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे.
हडपसर परिसरातील निराधार आणि गरजू लोकांना शेकडो ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना ब्लॅंकेट वाटले. या वेळी स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड व ‘विश्वसावली’चे अध्यक्ष निलेश शेलार, आस्क फाउंडेशन व वात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, स्मिता गायकवाड व निलेश शेलार यांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमासाठी आस्क फाउंडेशनचे दादासाहेब गायकवाड, स्मितसेवा फाउंडेशनचे सदस्य संतोषजी भाटिया, राजेंद्र भाडळे, उर्मिला प्रभुणे, सुनीता पाटील, वैशाली पाटील, विमल वागलगावे, सोनाली ओव्हाळ यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या वेळी बोलताना स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड म्हणाल्या की, मानवतेच्या भावनेतून वंचितांना प्रत्येकाने मदत करायला हवी. आपण प्रत्येकजण पुढे आलो, तर समाजात निर्माण झालेली दरी काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकेल. गरजवंतांची गरज पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून धन्य वाटते. तसेच यापुढील काळात संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल.