पुणे : बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. बोपदेव घाटात ही घटना घडली ते ठिकाण आरोपीने पोलिसांना दाखवले. सोबतच तरूणीवर अत्याचार केलेले घटनास्थळ देखील आरोपीने दाखवले आहे. या प्रकरणी धाक दाखवण्यासाठी आरोपीकडून वापरले गेलेले दांडके आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत. अटकेत असलेल्या आरोपीने मुलगी आणि त्याच्या मित्राला धमकावण्यासाठी वापरलेले दांडके व त्याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. चंद्रकुमार कनोजिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अख्तर शेख याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्याला अद्याप न्यायालयात हजर केलेले नाही. पुणे पोलिसांकडून आणखी एका आरोपीचा शोध अद्यापही सुरूच आहे. 3 ऑक्टोबरला बोपदेव घाटातील टेबल पॉइंट परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी एकामागून एक खुलासे समोर येत आहेत, तर हा गुन्हा करण्यापुर्वी आरोपींना दारू प्यायली होती. गांजाचे सेवन केले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
मोबाईल फ्लाईट मोडवर अन्…
बोपदेव घाटात गुन्हा करण्यापुर्वी आरोपींनी दारू आणि गांजाचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांनी हा गुन्ह्या केल्यानंतरही आपले मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले होते. आरोपींनी त्यांचे मोबाईलफोन फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
कोयत्याच्या धाक दाखवत तरुणीवर लैंगिक अत्याचार..
घटनेतील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी बोपदेव घाटात गुरुवारी (ता. 3) रात्री दहाच्या सुमारास दारू प्यायली, गाजांचे सेवन केलं आणि त्यानंतर त्यांनी घाटात बसलेल्या तरुण-तरुणीला बांबूच्या दांडक्याने मारहाण सुद्धा केली. कोयत्याचा धाक दाखवून तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून बोपदेव घाटातून वरती गेले. तसेच पोलिसांना आपण सापडू नये यासाठी मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. सुमारे 20 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास केला.