पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पोलीस आयुक्तालयाजवळ जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदकाम सुरु असताना तीन बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आले आहेत. बुधवारी (दि.30 ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड प्रेमलोक पार्क येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाजवळ असणार्या प्रेमलोक पार्क येथील नाल्याजवळ महापालिकेकडून जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरु होते. खोदकाम सुरु असताना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बॉम्बसदृश्य तीन वस्तू सापडल्या. यावेळी जलवाहिनी दुरुस्त करणार्या कर्मचार्यांनी तातडीने काम थांबवलं आणि याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.
त्यानंतर पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाचे बॉम्ब शोधनाशक पथक व श्वानपथक तसेच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सापडलेल्या वस्तु बॉम्बशेल असून त्यांची तपासणी केली असता हे बॉम्बशेल निकामी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पुढील प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.