पुणे : पुणे शहरातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटीला बॉम्बने उडवून देऊ, असा ई-मेल एका व्यक्तीने पाठविल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात ई-मेलधारकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य रजेश शितोळे (वय ३०, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य शितोळे हे विमानानगर येथील फिनिक्स मॉलमध्ये मॅनेजर म्हणून अकरा वर्षांपासून कामास आहेत. १७ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे दुपारी १२ वाजता शितोळे हे कामावर आले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी फिनिक्स मार्केट सिटी येथील विमाननगर पुणे ऑपरेशन मॅनेजर संदीप सिंग यांचा अधिकृत ई- मेल आयडी ओपन केला तेव्हा सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी एक ई-मेल मिळाल्याचे आढळून आले.
त्यांनी ई-मेल ओपन केल्यानंतर डिड्नस बोन नावाच्या एकाने ई-मेल केला. त्यामध्ये संबंधिताने मॉलमध्ये बॉम्ब ठेवला आहे. जे कोणी इमारतीच्या आतमध्ये आहेत, त्यातून कोणीही वाचू शकत नाही. मी हा बॉम्ब यासाठी प्लांट केला आहे की, मी माझ्या आयुष्याला वैतागलो आहे. या हल्ल्याला पिगी आणि नोरा जबाबदार आहेत, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे. शितोळे यांनी तातडीने याबाबतची माहिती विमानतळ पोलिसांना दिली.
त्यानंतर विमानतळ पोलिस बीडीडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातील कोणती बेवारस वस्तू आढळून येते का? याचा शोध सुरु आहे. या ठिकाणी घातपातविरोधी पथकाने परिसर पिंजून काढला. त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू येथे आढळली नाही. यामध्ये ई-मेल करणाऱ्याने अफवा पसरविण्याच्या दृष्टीने ई-मेल केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जी. बी. होळकर करीत आहेत.