पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना हा बॉम्ब आढळून आला आहे. यामुळे कामगार चांगलेच धास्तावले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. बॉम्बची माहिती मिळताच बीडीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
पोलिसांनी बॉम्ब नाशक पथकाच्या साहाय्याने तो एनडीएच्या जंगलात नेऊन स्फोटकांच्या साहाय्याने त्याचा स्फोट घडवून आणला आणि बॉम्ब निकामी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहन बीडीडीएस पथकाकडून करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एनडीए परिसरात उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एनडीए रस्त्यावरील कमळजाई मंदिर आहे, या मंदिराजवळच एका ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी काही मजूर काम करत असताना त्यांना अचानक बॉम्ब दिसून आला. बॉम्ब आढळून आल्याने कामगार चांगलेच धास्तावले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बीडीडीएस पथकाने तातडीने धाव घेतली. हा बॉम्ब निकामी करण्यात आला असून त्याची पॉवर कमी करण्यात आली आहे. बॉम्बची विल्हेवाट लावण्यात आली असून नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये, असं बीडीडीएस पथकाने सांगितलं आहे.