पुणे : बायको नांदायला येत नाही म्हणून वैतागलेल्या पतीने थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. यामुळे पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आहेत. पत्नी सोबत झालेल्या वादातून शहराला वेठीस धरण्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने पत्नीचा राग काढण्यासाठी पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. बायको नांदण्यासाठी परत आली नाही, तर पुणे शहरात बॉम्बस्फोट घडविण अशी धमकी त्या फोनमधून पुणे पोलिसांना देण्यात आली. सदर व्यक्तीने पुणे शहरात ७ ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली असून पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरु केला आहे.