पुणे : पुणे शहरातील खराडी येथील मुळा-मुठा नदीपात्रात एका महिलेचे डोके, हात-पाय तोडून टाकलेले धड आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेच्या शरीराचे काही अवयव बेपत्ता असून, त्यांचा ड्रोनद्वारे पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी शंभर किलोमीटर नदीपात्र परिसरात मॅपिंग करण्यात आले आहे. खासगी ड्रोनवाल्यांची यासाठी मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर पाणबुड्यांना देखील पाचारण करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. १६) सकाळी अकराच्या सुमारास खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात एका महिलेचे डोके, हात- पाय तोडून टाकलेले घड आढळून आले होते. दरम्यान, अद्याप संबंधित महिलेची ओळख पटलेली नसून तिच्या शरीराचे इतर अवयव देखील गायब आहेत. त्यामुळे तिच्या शरीराचे अवयव शोधण्यापासून तिची ओळख पटवून खुन्याला बेड्या ठोकण्यापर्यंतचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके काम करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
खडकवासला धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शोधकार्यात मर्यादा आणि अडचणी येत आहेत. पोलिसांनी महिलेच्या शरीराचे इतर अवयव शोधण्यासाठी ड्रोन मॅपिंग केले आहे. तसेच परिसरातील, नदीच्या घाटावरील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.