अरुण भोई
कळशी, (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भीमा नदी पात्रात वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून ७ जण प्रवास करत होते. यामधील ६ जण बुडाले आहेत, तर एक जण नदी पत्रातून पोहत बाहेर आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेतील अन्य लोकांचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी (दि. २१) सायंकाळच्या सुमारास कळाशी गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बचावले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून करमाळा तालुक्यातील कुगावकडे प्रवाशी बस जात असताना कळाशी गावच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली असे ७ प्रवासी आणि बोट चालक असे एकुण ८ जण प्रवास करत होते. यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत नदी पत्राच्या बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला.
या घटनेची माहिती मिळताच महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटांनी ही बोट पलटी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे एका कार्यक्रमासाठी हे सर्वजण निघाले असताना ही दुर्घटना घडली.