पुणे : अवयवय प्रत्यारोपणाचे वाढते प्रमाण आणि खासगी रक्तपेढ्यांकडून अमिष दाखवून केले जाणारे रक्तदान, या कारणामुळे पुण्यात काही रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हॉस्पिटलला जोडलेल्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत नसला तरी खासगी रक्तपेढ्यांमुळे हॉस्पिटलच्या रक्तपेढ्यांचा रक्तदाता कमी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रक्तपेढ्यांनी प्राधान्याने पुण्यातील रक्ताची गरज भागवावी, अन्य राज्यांमध्ये विक्री करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये दिवसभरात यकृत, हृदय आणि किडणी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. तर ज्युपिटर, जहांगीर, सह्याद्री, पुना हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. एका प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २० रक्तपिशव्या रक्त लागते. दिवसातून अशा पाच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या तरी त्यासाठी अंदाजे १०० रक्तपिशव्या लागतात. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो.
पुण्यातील एकूण ३२ रक्तपेढ्यांपैकी काही खासगी रक्तपेढ्या आहेत तर काही हॅस्पिटलशी निगडित आहेत. हॉस्पिटलसोबत निगडित रक्तपेढ्या रक्तदात्यांना अमिष न दाखवता रक्तदान घेतात. रक्तदान शिबिरेही घेतात आणि त्यांची रक्ताची गरज भागवतात. परंतु खासगी रक्तपेढ्या रक्तदात्यांना विमा, हेल्मेट, पेनड्राईव्हचे अमिष दाखवून रक्तदानाद्वारे रक्त घेतात आणि ते बाहेरच्या राज्यांत व्यावसायिक दराने विक्री करतात, अशाही तक्रारी करण्यात येतात. खासगी रक्तपेढ्या ग्रामीण भागात जाऊन शिबिरे घेतात तसेच संकलित झालेले रक्त राज्याच्या बाहेर नेऊन विकतात. परिणामी पुण्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. हे रक्त पुण्यातच राहण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड म्हणाले की, अवयव प्रत्यारोपण आणि घटलेली शिबिरांची संख्या यामुळे पुण्यात रक्तपेढ्यांमध्ये तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी ‘एफडीए’ने मुंबईला जसे शिबिर वाटून दिले तसे पुण्यातील रक्तपेढ्यांनाही यंत्रणा बसवून द्यायला हवी. येथे अनेक शिबिरे हेल्मेट, पेनड्राईव्ह देऊन करतात. त्यांच्यावर कारवाई देखील करायला हवी!”