पुणे : कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या दुसऱ्या अहवालातही मद्याचा अथवा अन्य कोणत्याही अमली पदार्थाचा अंश सापडला नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे एकंदर प्रकरणातील हवाच निघून गेली असल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णालयांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मुलाच्या रक्ताचे दोन नमुने घेण्यात आले होते. ससूनच्या नमुन्यात डॉक्टरांनी फेरफार केल्याने त्यांना अटक करण्यात आली. औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात रक्ताच्या नमुन्यातही मद्याचा अंश असल्याचे आढळलेले नाही. परिणामी, या खटल्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप युवकांचे बळी गेले. पुण्यातील बडा बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून या दोघांना चिरडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास मुलाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे अन्य चाचण्या पार पडल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्त तपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. काहीतरी काळेबेरे असल्याचे लक्षात आल्यावर त्याच दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास औंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवार, २६ मे रोजी पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालांमध्ये मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.
बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणी नमुना अहवालात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय 5 तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. तावरे, हाळनोर 5 यांच्यासह शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. त्यांना तपासासाठी येत्या ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अगरवाल याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्या व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला आहे. याप्रकरणी या डॉक्टरांविरुद्ध लाच घेऊन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत ससून रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर औंध रुग्णालयातील चित्रीकरणाचीही पडताळणी सरू आहे.