पुणे : पैशापुढे रक्ताचे नातेसुद्धा फेल आहे. अशी घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या संपत्तीचा वाटा माघारी घेण्यासाठी मुलीला चक्क वडील व भावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सुभाषवाडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (ता.२४) घडली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक संतोष सोनवणे (वय-७०), गुणवंत अशोक सोनवणे (वय-३७, दोघे रा. सुभाषवाडी, निघोजे. ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता पुत्राची नावे आहेत. याप्रकरणी अशोक सोनवणे याच्या मुलीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे वडील व भावाचे नाते आहे. फिर्यादी यांच्या आईने स्वतः खरेदी केलेली संपत्ती बक्षीस पत्राने फिर्यादी यांना दिली. तसेच एलआयसी पॉलिसीसाठी वारसदार म्हणून फिर्यादी यांचे नाव लावले.
दरम्यान, फिर्यादी यांच्या आईचे १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर वडील अशोक आणि भाऊ गुणवंत हे फिर्यादी महिलेच्या घरासमोर आले. एलआयसीच्या कागदपत्रांवर तसेच संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या कधी करणार, अशी धमकी देत फिर्यादीला शिवीगाळ केली.
त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला धक्काबुक्की करून फिर्यादींच्या घरातील साहित्य फेकून दिले. तसेच संपत्तीच्या कागदपत्रांवर जर फिर्यादीने सह्या केल्या नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी मुलीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीच्या वडील व भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.