पिंपरी : नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक मध्यरात्रीपर्यंत पार्ट्या करतात. काही जण नशा करुन वाहन चालवतात. यामुळे अपघाताच्या घटना वाढतात. स्वतः चालक व इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मद्यपान करत वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करून त्यांचे वाहन देखील जप्त करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध भागांत ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात कडक नाकाबंदी केल्याने मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या तावडीतून सुट शकणार नाही. नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. ब्रेथ अॅनालायझर मशीनच्या आधारे श्वासाचे नमुने तपासण्यात येणार आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच वाहनही जप्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, नववर्षाचे स्वागत करताना कोणीही मद्य पिऊन वाहन चालवू नका. स्वतःसह इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल, अशी वर्तणूक करू नका. नववर्षाचे स्वागत उत्साहाने, शांततेने, कायद्याचे पालन करुन करा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.