तुषार सणस
सारोळा : भोंगवली फाटा ते माहूर खिंड रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. हे अपघात थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, या मागणीला बांधकाम विभागाकडून कसलेही उत्तर मिळत नसल्याने सारोळा ते न्हावी लगतच्या सरपंच व ग्रामस्थांकडून भोंगवली फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडे काढणे, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी भोंगवलीचे सरपंच अरुण पवार, राजापूरचे सरपंच बाळासाहेब बोबडे, न्हावी गावचे सरपंच भरत सोनवणे, पी डी सी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्यासह सर्व ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक विभागासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सारोळा-वीर रोडवर राजापूर गावच्या हद्दीत नव्याने झालेल्या भोंगवली फाटा ते माहूर खिंड येथे मोठ-मोठे पडलेल्या खड्यांनी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूर्व भागातील सर्व सरपंचांनी ग्रामस्थांसह भोंगवली फाट्यावर सोमवार (दि. १२) सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन केले.
या वेळी रस्त्यावर पडलेले खड्डे का बुजविले नाही आणि रस्ता निकृष्ट दर्जाचा असताना अधिकारी शांत बसतात कसे? असा जाब आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विचाराला. अधिकाऱ्यांनी रस्ता दोन दिवसात बुजविणार असल्याचे सांगितल्यानंतर व भोंगवली फाटा माहूर खिंड रस्त्याचे काम स्वतः लक्ष देवून करणार असल्याचा विश्वास दिल्यानंतर आंदोलकांनी दोन तासानंतर आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
रस्त्यावर पडलेत मोठे खड्डे
राजापूर गावच्या हद्दीत एक फूट खोल खड्डे पडले असताना अधिकारी मात्र डोळे बंद करून कार्यालयात बसलेले असतात. भोंगवली माहूर खिंड रोड वर्षातच उखडतो कसा? या मागे मोठा काळाबाजार झाला असल्याचे वक्तव्य आंदोलनस्थळी सर्व ग्रामस्थ अधिकाऱ्यांना करत होते. सदरील प्रकरणी चौकशी होणे गरजेचे असल्याने या आंदोलनाकडे वरिष्ठ अधिकारी काय करतात? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष आहे.
अनेकदा वृत्तपत्रांच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामपंचायतमार्फत बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना रस्त्याची परिस्थिती कळवली जाते. परंतु संबंधितांशी हितगुज असल्याने कार्यालयात वृत्तपत्र पोहचत नसल्याचे आणि सरपंचाच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे आंदोलनस्थळी ग्रामस्थ चर्चा करीत होते
आम्ही अनेक वेळा भोंगवली फाटा माहूर खिंड रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचे तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात पत्रव्यवहार केले आहेत. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आंदोलन करण्यापर्यंत सरपंच व ग्रामस्थ यांना पाऊले उचलावी का लागत आहेत? याचे अधिकारी वर्गाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
अरुण पवार, सरपंच-भोंगवली