वाघोली : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सूरु असून प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचे नाव व छायाचित्रांचा वापर करून त्यांच्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रचारार्थ मजकूर प्रसारित केला जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित मजकूर हा कटके यांची बदनामी करणारा असल्याचे बघायला मिळत आहे.
एमसीएमसी समितीकडून (माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती) जाहिराती पूर्व प्रमाणीकरण न करता पोस्ट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम पेज चालविणाऱ्यास आपल्या स्तरावर सदर जाहिराती प्रामाणिकरण करून घेईपर्यंत त्वरित बंद करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आदेश शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन यांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, अनंता पंढरीनाथ कटके यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, राजापूरकर यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोणतीही राजकीय जाहिरात रेडिओ, वृत्तपत्र, केबल नेटवर्क, टीव्ही वाहिनी, ई वृत्तपत्र, सोशल मीडिया किंवा अन्य ठिकाणी प्रसिद्ध करावयाचे असल्यास त्याचे प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे; मात्र असे नियम असताना देखील weloveshirur या instagram पेजवरून तसेच काही फेसबुक पेजवरून ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके यांचे नाव, छायाचित्र व पक्ष चिन्हाचा वापर करत उमेदवार विजयी होण्याविषयी सकारात्मक मतांचे प्रदर्शन करून त्यासाठी जाहिरात करणे सुरू आहे
तसेच या सर्व लिंकवरील जाहिराती देणाऱ्या व्यक्तीस आपण सायबर अंतर्गत शोधून काढून संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. तथापि एमसीएमसी समितीकडून सशुल्क जाहिराती पूर्व प्रमाणिकरण न करता पोस्ट केल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे लिंकवरील जाहिराती प्रमाणिकरण करून घेईपर्यंत त्वरित बंद करण्यात याव्यात. अशा सूचना आपल्या स्तरावरून संबंधितांना द्याव्यात. उमेदवारांनी दिलेल्या खुलासानुसार अशा लिंकवरील उमेदवाराचे अकाउंट नसल्याचे उघड झाले असून सोशल मीडियाच्या जाहिराती बंद करून आपण पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
बदनामी करण्याचा डाव..
शिरूर हवेली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने EES वेब या कंपनीद्वारे कुठलाही आधार किंवा पुरावा नसलेली, खोटी माहिती समाजमाध्यमावर टाकण्यात येत आहे, असा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे. तरी याबाबत कार्यावाही केल्याचा अहवाल तत्काळ या कार्यालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.