Naryangaon: नारायणगाव: नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. सरपंच पदाच्या महिला उमेदवार आणि सदस्य पदाचे दोन उमेदवार यांचे फोटो काळ्या बाहुलीला लावून, फोटोवर लिंबू टाचण्या टोचून, कुंकू, हळद लावून जादूटोणा, भानामती करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अनिकेत अविनाश कोऱ्हाळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील मतदानाच्या आदल्या दिवशी अशाच प्रकारची घटना घडली होती.
नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार झाला आहे. या घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपात निषेध केला आहे. बाजारपेठेत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी दोन्ही बाजूच्या पॅनल प्रमुखांनी केली आहे.
नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी श्री.मुक्ताई – हनुमान ग्रामविकास व श्री.मुक्ताई – हनुमान ग्रामविकास परिवर्तन हे दोन पॅनल आमने सामने आहेत. या दोन पॅनलमध्येच सरळ व अटीतटीची लढत आहे. सतरा जागांसाठी सहा प्रभागातून पस्तीस उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
सरपंच पदासाठी श्री.मुक्ताई – हनुमान ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलच्या डॉ. शुभदा वाव्हळ आणि श्री मुक्ताई – हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी यांच्यात सरळ लढत आहे. ग्रामपंचायतची सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही पॅनेलचे प्रमुख व उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. सोशल मीडिया व इतर माध्यमाद्वारे ग्रामपंचायतच्या गैरकारभाराचे पुरावे देखील प्रचारादरम्यान सादर करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दरम्यान मतदारांना दोन ते तीन हजार रुपयांचे वाटप केले जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान शनिवारी सकाळी सदस्य पदाच्या उमेदवार सारीका कोऱ्हाळे – सोनवणे यांच्या सहजीवन हॉटेलच्या शटरजवळ एक पाटी आढळून आली.
या पाटीमध्ये दहा ते पंधरा टाचण्या टोचलेले लिंबू ठेवून सारीका यांच्यासह सदस्य पदाचे उमेदवार प्रशांत खैरे, वैशाली निंबारकर आणि सरपंच पदाच्या उमेदवार छाया केदारी यांचे फोटो काळ्या बाहुलीला चिटकवून त्यावर टाचण्या टोचण्यात आल्या होत्या. या फोटोंवर हळद-कुंकू वाहण्यात आले होते.
ही घटना कळताच स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली. याबाबतची माहिती रोहिदास केदारी यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार केदार यांनी भानामती करण्यासाठी वापरलेले साहित्य नदीपात्रात फेकून दिले. त्यानंतर याबाबतची तक्रार अनिकेत कोऱ्हाळे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अशाच प्रकारे येथील मुख्य बाजारपेठेतील जुन्नर रस्त्यावर टाचण्या टोचलेली लिंबे टाकण्यात आली होती. नारायणगाव सारख्या प्रगत असलेल्या गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याची ही घटना घडत असल्याने नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या बाबत संतोष खैरे (प्रमुख : श्री.मुक्ताई – हनुमान ग्रामविकास पॅनल) म्हणाले की, स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत या घटनेचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर लवकर आणावे.
दरम्यान पराभव दिसू लागल्याने मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचा वापर केला जात आहे. मागील निवडणुकीत सुद्धा अशी घटना झाली होती. या घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी श्री. मुक्ताई – हनुमान परवर्तन ग्रामविकास पॅनल प्रमुख रोहिदास केदारी यांनी केली.