वाघोली : पुणे माथाडी बोर्डाचे अध्यक्ष सुजित शिर्के व सचिव श्रीकांत चौबे यांच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात भाजपा क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे मार्केटयार्ड येथील पुणे माथाडी बोर्डाच्या कार्यालयासमोर सोमवारी तीन जून रोजी दुपारी एक वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह ताशानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
रांजणगाव पुणे येथील एल.जी.इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये माथाडीचे 54 नोंदीत कामगार काम करत आहे. या कामगारांवर देखरेख करण्यासाठी त्यांची मजुरी व लेव्ही माथाडी बोर्डात भरुन कामगारांना वेळेत पगार करण्यासाठी कंपनीने जगदंबा लॉजिस्टीक आणि ट्रान्सपोर्ट या फर्म सोबत एप्रिल 2021 ते एप्रिल 2024 असा तीन वर्षाचा करार केला होता. हा करार एप्रिल 2024 मध्ये संपुष्टात आला. हा करार संपल्यानंतर जगदंबा लॉजिस्टीकचे काम समाधानकारक नसल्याने कंपनीने कराराचे नूतनीकरण न करता त्यांचे काम 30 एप्रिल रोजी बंद केले व माथाडीचे काम पाहण्यासाठी ब्रम्हा लॉजिस्टीक आणि ट्रान्सपोर्ट या फर्म सोबत करार करुन 17 मे 2024 रोजी माथाडी बोर्डात पत्र लिहून जगदंबा लॉजिस्टीक चे काम बंद करुन ब्रम्हा लॉजिस्टीक या फर्मला मालक म्हणून नोंदीत करण्यात यावे असे कळवले.
एल.जी.इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून माथाडी बोर्डास दिल्यानंतर बोर्डाने मालक नोंदणीचा अर्ज ब्रम्हा लॉजिस्टीक या फर्मला देऊ केला. 29 मे रोजी ब्रम्हा लॉजिस्टीक कडून सदर अर्ज भरुन माथाडी बोर्डात जमा करण्यात आला. फॉर्म जमा झाल्यानंतर लगेचच बोर्डात मालक नोंदणी होऊन नोंदीत नंबर मिळणे अपेक्षित होते. परंतु माथाडी बोर्डाचे अध्यक्ष सुजित शिर्के व सचिव श्रीकांत चौबे जाणुन बुजून मालक नोंदणी करुन घेण्यास विलंब करत असल्याचे पै.संदीप भोंडवे यांनी सांगितले.
5 जुन 2024 च्या अगोदर 54 माथाडी कामगारांची मजुरी व लेव्ही माथाडी बोर्डात जमा केली तरच कामगारांचा पगार वेळेत होईल परंतु बोर्डाने अजुन ब्रम्हा लॉजिस्टीक या फर्मची मालक नोंदणी न केल्याने कामगारांचा पगार वेळेत होईल या बाबत शंका व्यक्त केली जात आहे . एल.जी.इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने पुन्हा दि.31 मे रोजी माथाडी बोर्डास पत्रव्यवहार करुन ताबडतोब ब्रम्हा लॉजिस्टीक या फर्मला मालक म्हणून नोंदीत करण्यास सांगितले आहे. मालक नोंदणीचा अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर वास्तविक सदर फर्मला नोंदीत करुन त्यांना नोंदीत नंबर देणे बंधनकारक असताना माथाडी बोर्डाचे अधिकारी जाणुन बुजून ब्रम्हा लॉजिस्टीक फर्मला नोंदीत करुन घेण्यास विलंब करत आहे . यामुळे 54 माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार वेळेत मिळणार नाही म्हणूनच हे ताशानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शरद बुट्टे पाटिल, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष विजय हरगुडे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविंद्र कंद, सुदर्शन चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, जिल्हा भाजपा महीला मोर्चा अध्यक्ष पुनम चौधरी, हवेली तालुका भाजपा अध्यक्ष शामराव गावडे, शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भाजपाचे नेते दादासाहेब सातव, प्रविण काळभोर, गणेश कुटे, स्वप्निल उंद्रे, अमोल शिवले व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील हे आपल्या पदाधिकाऱ्यांना कंपनीत ठेकेदारी देण्यासाठी कंपनीची व्यवस्थापन समिती व कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. कंपनीने भाजपा कार्यकर्त्यांच्या फर्मला देऊ केलेले काम सुध्दा ते कंपनीवर दबाव देऊन रद्द करण्यास सांगत आहे. यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज झाले असून येणा-या विधानसभा निवडणुकीत ते युती धर्म पाहतील याबाबत शंका आहे.
– पै.संदिप भोंडवे,महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष-क्रीडा आघाडी भाजपा