इंदापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आपल्या मनातील न्यूनगंड कमी करून पुढे येऊन स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना आदर्श मानून सामाजिक क्षेत्रात कार्य करावे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण भारतामध्ये 12 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत युवक सप्ताह आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.16) परिषदेच्या इंदापूर शाखेच्या वतीने कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ विद्यार्थिनी संमेलन हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना अंकिता पाटील-ठाकरे बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे तर प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन उपस्थित होत्या.
अंकिता पाटील-ठाकरे यांनी पुढे सांगितले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना नेतृत्व देण्यासाठी या संमेलनाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. अभाविपच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन यांनी सांगितले की, विद्यार्थिनींनी मागे न राहता प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन नेतृत्व करण्याची गरज आहे. विद्यार्थी परिषद मिशन साहसी, ऋतुमती अभियान अश्या कार्यक्रमांमधून विद्यार्थिनींच्या विषयात अविरत काम करत आहे,तसेच विद्यार्थिनींना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न विद्यार्थी परिषद करते व पुढील काळात सुद्धा करत राहील असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभाविप आयोजित क्रिकेट स्पर्धा, 100 मीटर धावणे स्पर्धा, 400 मीटर धावणे स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांचा फायदा घ्यावा, असे आवाहन अभाविप शहर मंत्री ओम मनसुखे यांनी केले. एम्बिशियस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडून पुढील ३० जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा संचालक बंगाळे यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर सहमंत्री योगेश भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभाविप तालुका संयोजक साक्षी हगारे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार जिल्हा सहसंयोजक व या विद्यार्थीनी संमेलनाची प्रमुख ऋतुजा शिंदे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नारायणदास महाविद्यालयाचे संजय सोरटे, समृध्दी कल्याणकर, रोहन रोकडे, आदित्य काकडे, ओंकार घोगरे, राजवर्धन भोसले, अमोल थिटे, मकरंद नवले, नवनाथ ढेंबरे यांनी प्रयत्न केले.