पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज रविवार (दि. १८) जुन्नरमधील नारायणगावमध्ये जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमासाठी नारायणगावात येणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपा कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्याच्याकडेला उभे होते. त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला हे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे.
तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शने देखील केली. भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या निदर्शनांमुळे अजित पवार गटातील नेते देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकारावरून नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणले सुनील तटकरे?
आम्ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी यासंदर्भात बोलणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणले. तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
तर त्यांनी या जिल्ह्याचं पालकत्त्व घ्यायला हवं
दरम्यान, निदर्शने करणारे पदाधिकारी म्हणाले कि, येथे शासकीय बैठक बोलावली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत नाही. ते (अजित पवार) पुण्याचे पालकमंत्री असतील तर त्यांनी या जिल्ह्याचं पालकत्त्व घ्यायला हवं. ते करण्याऐवजी ते त्यांचं वैयक्तिक राजकारण करत आहेत.