नारायणगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा रविवारी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (वारूळवाडी) येथे आली असता, जुन्नरच्या भाजप नेत्या आशा बुचके यांच्यासह कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवून ‘अजित पवार हाय हाय’, ‘पालकमंत्री हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात महायुतीत असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला.
यावेळी भाजप नेत्या आशा बुचके म्हणाल्या, जुन्नर पर्यटन तालुका असताना प्रशासकीय बैठक घेऊन घटक पक्षांतील नेत्यांना डावलले जात आहे. अजित पवार चोरून बैठका घेतात, प्रशासनाचा गैरवापर करतात, असा आरोप करत आमदार अतुल बेनके हा राष्ट्रवादीचाच कार्यक्रम असल्याचे सांगतात, असे बुचके म्हणाल्या. बैठकीतील फ्लेक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटोही टाकले गेले नाहीत. पर्यटन धोरण ठरवताना सर्व पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे महायुती मान्य नसे,ल तर अजित पवार यांनी ते जाहीर करावे, अशी मागणीही आशा बुचके यांनी केली