पुणे : पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले.त्यामुळे हडपसरमध्ये महायुतीत पुन्हा एकदा मिठाचा खडा पडल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे करत आहेत, असा आरोप करत भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे घुले यांनी सांगितले. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला आहे. मात्र, विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत असल्याचा आरोप शिवराज घुले यांनी केला आहे.
बाळासाहेब घुले म्हणाले, मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.