पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, जर अजित पवार हे सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता देखील नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले आहे, असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासमोर पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीमध्ये आपली खदखद बोलून दाखवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढावे, असे प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे. या गोष्टीला तुम्ही सल्ला समजलात तरी हरकत नाही. अजित पवार यांनी सुभाष बापू, राहुल दादांवर, योगेश अण्णांवर मोठा अन्याय केला आहे. हे तिघेही मंत्री होऊ शकले असते, अनेक लोकांना विविध महामंडळ मिळाले असते. अजित पवार यांच्याकडे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे निधी मागायला गेले, तर ते म्हणाले येथे तुमचा काय संबंध? आम्ही 10 टक्केच निधी देणार. आम्हाला नको आहे अशी सत्ता, असे देखील चौधरी यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी नेहमी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. जर अजित पवार हे सत्तेत असतील, तर आम्हाला सत्ता नको आहे. पुणे जिल्ह्याला स्वाभिमानी नेतृत्त्व मिळत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यातील लोकांचे मोठे हाल झाले आहेत. ज्या राष्ट्रवादीला आम्ही गेली 10 वर्षे विरोध करत आहे, तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी बसवून ठेवली आहे. कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवारांना कशासाठी महायुती सरकारमध्ये घेतले आहे? असा सवाल देखील सुदर्शन चौधरी यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून ते तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीमध्ये अजित पवार आणि आगामी विधानसभेला आपली सत्ता येत असेल, तर ती सत्ता आम्हाला नको आहे, अशी भावना आहे. आम्ही काय करायचे अशा सत्तेचे, जिथे अजित पवारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे, तिथे येऊन त्यांनी बॉस व्हायचे आणि आदेश द्यायचे. तसेच वेळोवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचे काम करायचे. आम्हाला अशी सत्ता नको आहे, अशी भावना भाजप उपाध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केली आहे.