चाकण (पुणे): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “अब की बार ४०० पार ” ही घोषणा यशस्वी करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात “कमळ” चिन्हावरच लढणारा उमेदवार असावा, ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याची प्रबळ इच्छा आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्याचा उत्साह लक्षात घेऊन, त्यांची वरील इच्छा दिल्लीपर्यंत पोहचविणार असल्याची ग्वाही उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी चाकण (ता. खेड) येथे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपल्याला मते मागायची आहेत. विरोधक हे मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन कितीही टीका करत असले तरी, मागील दहा वर्षांच्या काळात देशाची वाढलेली पत, सरकारने केलेली कामे मतदारांच्या समोर असल्याने नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा विश्वासही ब्रिजेश पाठक यांनी यावेळी व्यक्त केला.
चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात शिरुर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, सुपर वॉरियर्स व पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २८) पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ब्रिजेश पाठक यांनी वरील ग्वाही दिली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, लोकसभा सहप्रभारी राम गावडे, लोकसभा विस्तारक माजी आमदार योगेश टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, सरचिटनिस डॉ. ताराचंद कराळे, संजय रौधळ, दादासाहेब सातव, रामदास हरगुडे, धर्मेद्र खांडरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण काळभोर, भाजपाच्या महिला अध्यक्षा पुनम चौधरी, भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाचे अध्यक्ष जनार्दन दांडगे, मेळाव्याचे संयोजक प्रिया पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला यापुर्वी आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतरच्या सरकारला ते टिकवता आले नाही. पुन्हा एकदा याच सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण दिले आहे. राज्यभरात कुणबी समाजाच्या नोंदी मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने, कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांना आरक्षण ओबीसीमधून आपोओप मिळणार आहे. तर उर्वरीत समाजाला दहा टक्क्यांमधून आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाबरोबरच फडणवीस यांनी मराठी समाजासाठी अनेक योजनांच्या माध्यमातुन सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही लोक त्यांच्याच नावाने बोंब मारत आहेत. कोणी कितीही ओरडले तरी, मराठा समाज महायुतीच्या व पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे, असंही लांडगे यांनी म्हटले.
दरम्यान यावेळी बोलताना शरद बुट्टे-पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावर लढणारा असावा, अशी आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघ पिंजुन काढले आहेत. पक्षाने दिलेला प्रत्येक कार्यक्रम आम्ही गावपातळीवर जाऊन राबविला आहे. लोकसभेचा उमेदवार कोणीही असला तरी, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही लढणार आहोत, असेही बुट्टे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.