उरुळी कांचन, (पुणे) : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते संतापले. त्यांनी या पोस्टवर कारवाई करण्याची मागणी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उरुळी कांचन येथील एका व्यक्तीच्या नावाने व्हाट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार व आदी व्यक्तींसह 665 जणांचा समावेश आहे. या ग्रुपवर नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करत एक पोस्ट प्रसिद्ध झालेली आढळून आली. ज्या पोस्टमधील चुकीच्या मजकुरामुळे भाजप नेते व कार्यकर्ते यांच्यात तेढ निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे असे असल्याचे सिद्ध होते.
शनिवारी (ता.18) सायंकाळी 5 वाजून 39 मिनिटांनी ग्रुपमधील इसम तोफिक तांबोळी, (रा. बाजार मैदान, उरुळी कांचन, ता. हवेली) याने कोविड आजाराच्या लसीमुळे प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील मृत इसमाचा फोटो पाठवून सदर फोटोच्या खाली सदर मयत इसमाच्या खाली खोटी माहिती तयार केली आहे. व त्या इसमाचे निधन हे हृद्यविकाराच्या आजाराने झाल्याचे सांगितले आहे.
या इसमाने कोवीशिल्ड ही लस घेतल्याचे नमूद केले आहे. व सामान्य लोकांना घाबरवण्यासाठी तुमच्यावरही ही वेळ येणार आहे व त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी ठरविले आहे. व धन्यवाद मोदिजी असा संदेश सर्वत्र पाठवला आहे. अशा बिनबुडाच्या आरोपांमुळे व सामान्य माणसांच्या मनात भीती उत्पन्न करण्याच्या हेतून तोफिक तांबोळी या इसमावर कारवाई करण्याची मागणी भाजप उरुळी कांचन यांच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान, अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून यामुळे वातावरण गढूळ करून वाईट उद्देश स्पष्ट दिसून येतो. याबाबत तपास आणि खातरजमा करून या पोस्टकर्त्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अमित कांचन, पूजा सणस, श्रीकांत कांचन, वकील भाऊसाहेब कांचन, अक्षय महाराज रोडे, श्रद्धा कुंभार, नवनाथ चव्हाण, आकाश मोरे, खुशाल कुंजीर, अजिंक्य राजेंद्र कांचन यांनी केली आहे.