पुणे: पुणे शहरातील सर्वात लहान मतदारसंघ असलेल्या आणि भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी रविवारी जाहीर न झाल्याने आता उत्कंठा वाढलेली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत २८ वर्षांनंतर भाजपचा कसबा विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिसकावून घेतला होता. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महायुती विरुद्ध मविआ अशी लढत झाली होती.
२००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेनंतर कसब्यात काँग्रेसची मते असलेला भाग सहभागी झाला होता. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्व पक्षांनी तयारी केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप व अखंड शिवसेना अशी युती होती. तरी सुद्धा या ठिकाणी नगरसेवक विशाल धनवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो शेवटपर्यंत कायम होता. तरी सुद्धा मुक्ता टिळक या विजयी झाल्या होत्या.
मात्र, पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेस आपल्या ताब्यात घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पुणे लोकसभा निवडणुकीत कसब्यात भाजपला लिड मिळाल्याने या मतदारसंघातून उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर आणि गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा आहे. महायुतीच्या जागावाटपात कसबा हा भाजपकडे असल्याने या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ असणार आहे.