पुणे: राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. अशातच पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. त्यांना धमकीचा हा फोन इंटरनॅशनल नंबरवरून आला आहे. रविवार पाच मे राजी रात्री हा प्रकार घडल्यानंतर बिडकर यांनी पुणे पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली आहे. माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना मिळालेली ही दुसरी धमकी आहे. गेल्या मागील वर्षी मार्च महिन्यात देखील त्यांना अशी धमकी मिळाली होती.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना रविवारी रात्री इंटरनॅशनल नंबरवरून एक फोन आला आहे. या फोन करणाऱ्याने बिडकर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. जर तुम्ही 25 लाख रुपये दिले नाही, तर तुमचा व्हिडिओ व्हायरल करु, तुमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे.