शिरुर, पुणे : एखाद्या मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं, तर काही दिवस कुटुंबात खदखद असतेच, मात्र कालांतराने ती सून कुटुंबाची आवडती बनते, असं भाष्य शिवाजीराव आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिल्याने केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर भाजपमध्ये ही खदखद निर्माण झाली आहे. हीच खदखद दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महायुतीत खदखद असल्याची कबुली दोन्ही नेत्यांनी दिली.
कुटुंबातील मुलाने कुटुंबाला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं कि काही दिवस कुटुंबात खदखद असते, मात्र सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत चंद्रकांत पाटलांनी खदखद दूर झाल्याचं सांगितलं आहे. अजूनही चाळीस दिवस आहेत. या छोट्या-छोट्या चुका सुधारल्या जातील. घटना घडली की त्यात सुधारणा करत जाऊ, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
सगळे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील : उदय सामंत
उदय सामंत म्हणाले की, शिरूर लोकसभेत महायुतीत कोणतं ही नाराजीनाट्य होऊ नये, म्हणून आज तीन प्रमुख पक्षांसह घटक पक्षांची बैठक झाली आहे. समन्वय साधण्याचाचं हा प्रयत्न होता, आता यापुढं फक्त प्रचार सुरू राहणार आहे. त्यासोबतच शिवाजी आढळरावांचा पहिल्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. आजच्या बैठकीनंतर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने प्रचार करतील. सगळे एकदिलाने काम करतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.