पिंपरी-चिंचवड: मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आमदार सुनील शेळके यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी उघडपणे विरोध केला आहे. खासदार श्रीरंग बारणे हे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आहेत. त्यामुळे मावळमधील माजी मंत्री बाळा भेगडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून बारणे यांच्या उमेदवारीला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. शनिवारी बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी बारणे यांना विरोध असल्याचे सांगितले.
मावळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी खासदार श्रीरंग बारणे हे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. दुसरीकडे मतदारसंघात मात्र भाजप त्यांच्याविरोधात एकत्र आली आहे. आम्ही दोनवेळा बारणेंसाठी काम केले आहे. परंतु,आता आम्हाला बारणे उमेदवार नको आहेत. तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना उमेदवारी लोकसभेसाठी उमदेवारी द्यावी, असा सूर या बैठकीत होता. बाळा भेगडेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित गटाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील श्रीरंग बारणेंना सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. अशात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्हीयकर्ते भेगडेंसाठी आक्रमक झाले आहेत. येत्या सोमवारपर्यंत शिंदे गटाकडून बारणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.