शिरोली : खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे खेड-आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे देशमुख यांनी आपला राजीनामा पाठविला. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख भाजप पक्षात अस्वस्थ होते. भाजपा पक्षाच्या व महायुती पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचे प्रचारार्थ आयोजित बैठकीला ते अनुपस्थित राहिले. रविवारी (दि.७) त्यांनी दुपारी पत्राद्वारे पक्षाचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना देशमुख यांनी राजीनामा दिल्याने भाजपाला धक्का बसला आहे. आता देशमुख नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठ नेत्यांनी निधी द्यायला टाळाटाळ केली. असा आरोप देशमुख यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला. भारतीय जनता पार्टीला कोणत्याही प्रकारची माझी आवश्यकता राहिलेली नाही. म्हणून मी भाजपा प्राथमिक सदस्यत्वासह खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.