पुणे : पुणे महानगरपालिकेच्या बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण नसल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी भाजपचे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर यांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.
शहारातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मॉडेल कॉलनी परिसर, शिवाजीनगर गावठाण, वडारवाडी, रेवेन्यू कॉलनी, प्रभात रोड, भांडारकर रोड, दुर्गानगर, आनंद यशोदा सोसायटी व छत्रपती शिवाजीनगर या भागात पाणीपुरवठा कमी दाबांमध्ये होत असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होत. याबाबत बुधवारी (दि. १८) भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ महानगरपालिकेत पोहचले. महानगरपालिकेचे पाणीपुरवठाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांची भेट घेऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करा, अशा मागणीचे निवेदन दिले. या वेळी दत्ता खाडे, नंदकुमार मंडोरा, जितेंद्र मंडोरा, शैलेश बडदे, हेमंत डाबी, राजेश नायडू, अपर्णा कुऱ्हाडे, भावना शेळके, पूजा जागडे, सुजित गोटेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.