पुणे: अपर तहसील लोणी काळभोर यांच्या प्रमाणभूत क्षेत्रातील फेरफार नोंदीच्या विसंगत भूमिकेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर “ढोल ताशा नाद मोर्चा” आयोजित केल्याची माहिती पैलवान संदीप भोंडवे यांनी दिली.
अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या भूमिकेमुळे पुर्व हवेलीतील हजारो शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या वेगवेगळ्या नियमांबाबत संदीप भोंडवे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान तृप्ती कोलते या हवेलीला तहसीलदार असताना त्यांच्या अधिपत्याखाली सामाईकात खरेदी केलेल्या अकरा गुंठेच्या नोंदी नियमितपणे होत होत्या. मात्र, त्याच अधिकारी अपर तहसील लोणी काळभोरला कार्यरत झाल्या व सामाईकातील अकरा गुंठेच्या नोंदी रद्द होऊ लागल्या आहेत. त्यामुळे तहसील एकच, मात्र फेरफार नोंदीबाबत कायदा वेगवेगळा, अशी कोलदांड्याची खुटी अपर तहसील लोणी काळभोर कार्यालयाने शेतकऱ्यांना मारली आहे.
सामाईकात खरेदी केलेल्या अकरा गुंठेची नोंद सातबारा उतारावर पुणे जिल्ह्यांत व हवेली तालुक्यात होत आहेत. मात्र, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयात या नोंदी होत नाहीत. यासाठी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना परिपत्रक बजावले आहे. तसेच सामाईकातील अकरा गुंठेच्या नोंदी न करण्याच्या तोंडी सूचना मंडल अधिकाऱ्यांना तहसीलदार कोलते यांनी दिल्याने संदीप भोंडवे यांनी हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या भुमिकेमुळे पुर्व हवेलीतील हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रमाणभुत क्षेत्र खरेदीखताच्या नोंदणीकरीता पुणे जिल्ह्यात एकच कायदा असावा आणि शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी पुर्व हवेलीमधील शेतकऱ्यांना सोबत घेत १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे भव्य ढोल ताशा नाद मोर्चा आयोजित केला आहे.
– पैलवान संदीप भोंडवे, पुणे जिल्हा नियोजन मंडळ, उपसमिती सदस्य