पिंपरी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच ५०० वर्षांपासूनचे भारताचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत रामलल्लाची स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांकातील महिलांना न्याय दिला. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने राष्ट्र कल्याणाचे कार्य केले आहे. त्यामुळे एक चुकीचे मत देशाचा विकास थांबवू शकते. विकसित भारत करण्यासाठी महायुतीला म्हणजे मोदी यांना मत द्यावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडीत नमो संवाद सभा आणि ओबीसी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपूरूष आहेत. त्यांनी सत्तेत येताच अयोध्येत ५०० वर्षानंतर रामलल्लाची स्थापना झाली. तिहेरी तलाक पद्धत रद्द करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय मिळवून दिला. गेल्या दहा वर्षांत मोदीजींनी राष्ट्र कल्याणाचे कार्य केले आहे. त्यांनी देशाच्या सीमा भक्कमपणे सुरक्षित करण्याचे काम केले. यंदाची निवडणूक ही देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. तुमचे एक चुकीचे मत देशाचा विकास थांबवू शकते. मोदी यांना दिलेले एक मत विकसित भारतासाठी असणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मत देऊन मोदीजींना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.”
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, “या देशाचा पंतप्रधान ओबीसी समाजाचा आहे, ही अभिमानाची बाब आहे. ही देशाची निवडणूक आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी मतदान करावे. काँग्रेसने ओबीसीला घटनात्मक दर्जा दिला नव्हता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दर्जा दिला. ओबीसीला सर्वाधिक राजकीय भागीदारी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फक्त एक ओबीसी उमेदवार दिला आहे. दुसरीकडे भाजपने ७ ओबीसी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ओबीसींनी महायुतीला मतदान केले पाहिजे. मोदी यांच्या हातात सत्ता म्हणजे देशाचे संरक्षण हे सूत्र आहे. जगात देशाचे नाव उंच करण्याचे काम ते करतात. त्यामुळे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.”
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या सत्तेत सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी काम झाले आहे. अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील वंचित नागरिकांना मदत करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. ओबीसी समाजातील बारा बलुतेदारांसाठी १४ हजार कोटी रुपयांची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजना मोदी सरकारने सुरू केली. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या योजनेमुळे अनेक कुटुंबांना स्थैर्य लाभणार आहे. मोदी सरकार हे देशातील नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे आहे. आता देशात समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, ३ कोटी महिलांना लखपती दीदी तसेच ४ कोटी गरीबांना पक्की घरे देण्याची गॅरंटी मोदी यांनी दिली आहे. त्यामुळे मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.”