पुणे : भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख आशा बुचके यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. या दोघांचेही राजीनामे पक्षाने स्वीकारल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
दगडे यांनी भोरमध्ये, तर बुचके यांनी जुन्नरमध्ये बंडखोरी केली आहे. भोरमध्ये राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी असूनही दगडे यांनी बंडखोरी केली. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी दिली असतानाही बुचके यांनी बंडखोरी केली. दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत भाजपने या नेत्यांवर कारवाई केली नव्हती.