पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी स्वीकारण्यात आलेल्या रकमेपैकी अडीच लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोर याने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडे ठेवण्यास दिली होती. पैशांबाबत संबंधित विद्यार्थ्यांस विचारणा केली असता, त्याने डॉ. अजय तावरे यांच्यामुळे मला पैसे मिळाले आहेत. माझ्याकडे कपाट नसल्याने ही रक्कम तुझ्या कपाटात ठेव.
१५ दिवसांनी मी ते तुझ्याकडून घेईन, असे डॉ. हाळनोर याने सांगितल्याची माहिती विद्यार्थ्याने पोलिसांना दिल्याचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयाला दिली. दरम्यान, विद्यार्थ्याने कशाचे पैसे मिळाले याबाबत विचारणा केली असता, डॉ. हाळनोर म्हणाले नंतर सांगतो काळजी करू नको, असे सांगून विद्यार्थ्यांकडे २ लाख ५० हजार दिल्याचे अॅड. हिरे यांनी युक्तिवादादरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाने त्याचे रक्ताचे नमुने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, अमर गायकवाड आणि अशपाक मकानदार येरवडा कारागृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे यांनी युक्तिवादा केला आहे.
न्यायालयात युक्तिवाद करताना अॅड. हिरे म्हणाले, ससून सर्वोपचार रुग्णालयातील डीव्हीआरमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर, अल्पवयीन मुलगा, शिवानी अगरवाल व अन्य व्यक्तींसह साक्षीदार महिला हे सर्व उपस्थित आहेत. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन युवकाला जेव्हा अपघातग्रस्त पोर्शे कारमधून बाहेर काढले, तेव्हा तो उभा राहण्याच्या स्थितीतही नव्हता.
मात्र, डॉ. हाळनोर यांनी दिलेल्या अहवालानुसार तो मद्याच्या अमलाखाली नसल्याचे नमूद केले आहे. अल्पवयीन मुलासह त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने हे ससून रुग्णालयातील विश्राम कक्षात घेण्यात आले. रक्ताची अदलाबदल ही डॉ. अजय तावरे आणि विशाल अगरवाल यांच्या सांगण्यानुसार करण्यात आली.