संतोष पवार/पळसदेव : शासन निर्णय दि.१४ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशान्वये राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांनी विद्यार्थी शिक्षक – शिक्षकेत्तर यांची बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली (Face Recognition) उपस्थिती नोंदवण्याचे बंधनकारक आहे. अन्यथा अशा शाळांचे वेतन रोखण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत .
बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखुन ठेवण्यात येईल, असे निर्देशही पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत . बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीची आवश्यक सर्व माहिती शाळांना देण्यात आली आहे.
त्यासंदर्भातील काही समस्या असल्यास १३ जानेवारी २०२५ पर्यत माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती देण्याचे, तसेच अशा शाळांमधील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक / शिक्षकेत्तर यांचे सप्टेंबर – डिसेंबर २०२४ चे बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थिती रिपोर्ट सादर करणे , विद्यार्थी माहिती विद्या समिक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करणे, विद्यार्थी आधार कार्ड संलग्नित अपार आयडी कार्यान्वित झालेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत .
दरम्यान, सर्व माहिती परिपूर्ण यादीसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा / तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संस्थाप्रमूख तथा मुख्याध्यापक यांची राहिल असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांनी नमूद केले आहे.