विशाल कदम
लोणी काळभोर : आपल्यापैकी अनेकांनी जत्रेमध्ये खेळला जाणारा ‘मौत का कुआ’ हा खेळ कधी ना कधी पाहिलाच असेल. हा खेळ पाहायला जितका मजेदार वाटतो तितकाच तो धोकादायक आहे. एक लहानशी चूक देखील चालकाच्या जीवावर बेतू शकते. मात्र, अशाच प्रकारच्या गाड्यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोक चांगलेच त्रस्त आहेत. या गाड्या अतिशय वेगात जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
कदमवाकवस्ती येथील इंदिरा नगर, समता नगर व घोरपडे वस्तीच्या परिसरात एकजण विनानंबर प्लेटची दुचाकी भरधाव वेगाने चालवताना दिसतो. ‘मौत का कुआ’मध्ये ज्याप्रमाणे धोकादायकरित्या स्टंटबाजी होते. त्याचप्रमाणे हा दुचाकीचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून स्टंटबाजी करत आहे. त्याने दुचाकीची पुंगळी काढल्याने या दुचाकीचा मोठा आवाज येतो. तसेच गाडीच्या सायलेन्सरमधून धूरही मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे ध्वनि प्रदूषणासह वायूप्रदूषणही होते.
इंदिरा नगर, समता नगर व घोरपडे वस्तीच्या परिसरातील शेकडो मुले लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे असलेल्या अनेक नामवंत शाळेत शिक्षण घेत आहेत. मुलांना शाळेत घेऊन जाताना पालक दुचाकीवरून अथवा पायी घेऊन जातात. तर काही विद्यार्थी सायकल अथवा चालत शाळेत जातात. नेमकं याचदरम्यान हा चालक भरधाव वेगाने दुचाकी चालवून स्टंटबाजी करताना दिसतात. इतकेच नाहीतर ही व्यक्ती रस्त्यावर स्टंटबाजी करताना समोरून येणाऱ्यांना कट मारून जातात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
काही वेळा रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाटसरुंच्या अंगावर गाडी गेल्याचे अनेक प्रकारही घडले आहेत. या चालकाच्या दररोज होणाऱ्या त्रासाला नागरिक कंटाळले आहे. तरी, या स्टंटबाज चालकावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दुचाकीचालकावर कारवाई व्हायला हवी
लोणी स्टेशन येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना शाळेत सोडवायला व आणायला जात असते. यादरम्यान, हा दुचाकीचालक बेदरकार गाडी चालवतो. त्यामुळे खूप भीती वाटते. याला वेळीच लगाम लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– स्मिता जगताप, गृहिणी, कदमवाकवस्ती, ता. हवेली.
आवाजाने वाटते भीती
माझे एक वर्षाचे बाळ आहे. ते दररोज दुपारच्या वेळेस झोपत असते. तेव्हा भरदुपारी फटफट आवाज करणारी गाडी येते. त्यामुळे बाळाच्या झोपेवर परिणाम होतो. या आवाजाने मनात प्रचंड भीती वाटते. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे.
– पल्लवी गायकवाड, गृहिणी, कदमवाकवस्ती, ता. हवेली.
गल्लीबोळात दुचाकींची संख्या जास्त
या दुचाकी शहरात किंवा मुख्य रस्त्यावर दिसत नाहीत. कारण, त्या दिसल्या की पोलिसांकडून कारवाई अटळ असते. त्यामुळे या दुचाकींचा सर्वात जास्त वावर हा गल्लीबोळातच असल्याचे दिसत आहे. याची संख्याही जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी शक्य तेवढ्या वेळात येऊन कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.