पुणे : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी परिसरात घडली आहे. पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध खडकी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश बुग्या लावुड्या (रा. शास्त्रीनगर, ज्ञानराज चौक, पिंपरी-चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रमेश यांचा भाऊ गणेश (वय-३५, रा. पिंपळे सौदागर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दुचाकीस्वार रमेश मुंबई-पुणे रस्त्याने निघाले होते. बोपोडीतील गोपी चाळीसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार रमेश यांना जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. या घटनेत रमेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.