पुणे : हडपसर येथील हांडेवाडी परिसरात भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मेघांत शेवाळे (वय २४, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, मांजरी फाटा, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मेघांतचा नातेवाईक सोमनाथ पांडुरंग काटे (वय ५३, रा. काटेनगर, पिंपळे सौदागर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी डंपरचालक मुकेश किसन पवार (वय ४८, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघांत गुरुवारी (ता. ८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रस्त्याने निघाला होता. चिंतामणीनगर येथील गंगा व्हिलेज सोसायटीजवळ डंपरने मेघांतला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मेघांत याचा मृत्यू झाला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे करीत आहेत.