दीपक खिलारे
इंदापूर : दफ्तर तपासणीचा ‘बिजवडी पॅटर्न’ संपूर्ण पुणे जिल्ह्यात आदर्श व अनुकरणीय तसेच राज्यातील आरोग्य सेवेस दिशादर्शक असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी सांगितले. गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी येथे भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. अभय तिडके, डॉ.सचिन एडके, डॉ. सुरेखा पोळ यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत विविध आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये प्रसूती पूर्व तपासणी, संस्थात्मक प्रसूती, बाळांचे लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप आदी कीटकजन्य आजार प्रतिबंधक सर्वेक्षण, अंगणवाडी व शाळा तपासणी मोहीम, मानसिक आरोग्य समुपदेशन, अॅनिमिया मुक्त भारत इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.
हे सर्व उपक्रम योग्य पद्धतीने राबविले जातात, याची खातरजमा करण्यासाठी डॉ. भगवान पवार आणि डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धतीमधून प्रेरणा घेऊन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी, काटी व शेळगाव अंतर्गत एकूण १९ आरोग्य वर्धिनी केंद्रांची तज्ञांच्या पथकामार्फत दफ्तर तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, अंतर्गत स्वच्छता, साहित्यांची उपलब्धता, रुग्णसेवेचे १११ निर्देशांक, ९४ नोंदवह्यांचे पूर्णत्व, लोहयुक्त गोळ्या वाटप, गृहभेटी आदी बाबींची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले आदी मान्यवरांनी तालुक्यात आरोग्य सेवा सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी डॉ. सुश्रुत शहा करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देत समाधान व्यक्त केले.
तपासणीवेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, आशा प्रवर्तक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. पंचायत समिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी संतोष बाबर, दिपक उत्तेकर, सुरेश शिर्के यांनी या विधायक उपक्रमाचे कौतुक करत इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी या मोहिमेचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा
तपासणी दरम्यान उच्च रक्तदाब, डायबेटिस यांसारखे राष्ट्रीय असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, संस्थात्मक प्रसूती, आयुष्मान भारत हेल्थ कार्ड व आभा नोंदणी यामध्ये १०० टक्के प्रगती करण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा १८ वर्षांवरील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.