दीपक खिलारे
इंदापूर : बारामतीची लढाई ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आहे. काही लोकांना असं वाटतंय की, ही लढाई सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आहे. परंतु, ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मोदींच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे होत्या. कलम 370 ला विरोध सुप्रिया सुळे यांचा होता, असा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. फडणवीस म्हणाले, “2019 मध्ये छोटासा अपघात झाला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. मनाला बोचणारा पराभव होता. पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही काही लोकं मतांच्या विरोधात गेले. निव्वळ खुर्चीसाठी आमचे 25 वर्षांचे मित्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठरवलं. महाविकास आघाडीत आपल्याला राहायचं नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी देखील खदखद सुरू होती. म्हणून अजित पवारांनी विकासासाठी मोदींसोबत गेलं पाहिजे, असा विचार केला. जे लोकं आपल्यासोबत यायला तयार होते. त्यांना सोबत घेतलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
“काही ठिकाणी आपला संघर्ष हा राष्ट्रवादीसोबत होता. काही ठिकाणी टोकाचा संघर्ष होता. मोदी साहेबांसाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मी निर्णय घेतल्यानंतर तीन-चार लोकांशी बोललो. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील होते. नेत्यांना युती करणं सोपं असतं. मात्र, कार्यकर्त्यांना युती करणं अवघड असतं. आपल्याला मोठ्या ध्येयासाठी काम करायचं आहे. झालं ते विसरून महायुतीसाठी काम करायचं आहे. मोदींसोबत बारामतीचा खासदार पाहायचा आहे. तुमचं म्हणणं समजून घेतलं आहे आणि कृतीतून करून दाखवणार हा विश्वास देण्यासाठी आज आलो आहे”, असं आश्वासनही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलं.
इंदापूर तालुक्यात भ्रष्टाचार वाढला
या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, बारामतीत फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांची नेमकी किती ताकद आहे, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमचे चार-पाच प्रश्न आहेत. ग्रामपंचायतीमधील आमच्या कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही. सरपंच अवैध ठरवले जातात. आम्ही गावांमध्ये मतं मागायला जातो, तेव्हा लोकांना काय सांगणार? इंदापूर तालुक्यात भ्रष्टाचार वाढला आहे. या सगळ्याचा महायुतीवर कुठेतरी परिणाम होत असतो, याची दखल देवेंद्र फडणवीसांनी घेऊन त्यांनी तालुक्याचे पालकत्व स्विकारावे, असे पाटील यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी आपल्या जिल्हा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील कामाचा आढावा घेतला. प्रस्तावना तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केली. यावेळी आमदार राहुल कुल, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राजवर्धन पाटील, बाळासाहेब गावडे, चंद्राराव तावरे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, स्नेहलता दगडे, अविनाश घोलप, बाबामहाराज खारतोडे, लालासो पवार, देवराज जाधव, मारूतराव वणवे, अतुल तेरखेडकर, माऊली चवरे, तानाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.