पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना अभिजित मानकर याने खेड शिवापूर परिसरात सीमकार्ड आणि पैसे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मानकर आणि आरोपींमध्ये संभाषण झाले आहे. मानकरच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत, असे तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले.
मोहोळ खून प्रकरणात अभिजित अरुण मानकर (वय ३१, रा. दत्तवाडी) याला गुन्हे शाखेने अटक केली. आतापर्यंत खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मानकरला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणारा मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात मानकर होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाइल संचाची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. आरोपींच्या मोबाइलमध्ये १९ हजार ८२७ ध्वनिमुद्रित फिती (रेकॉर्डिंग) आढळून आल्या आहेत. त्यापैकी १० हजार ध्वनिमुद्रित फितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी सहा ध्वनिमुद्रित फिती मोहोळ खून प्रकरणाशी संबंधित आहेत. मानकर याच्या आवाजाचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचे आहेत. तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे, असे सहायक आयुक्त तांबे यांनी सांगितले.
खुनाच्या कटात मानकर सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या आवाजाची चाचणी करण्यात येणार आहे. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवादात केली. विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी मानकरला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.