संदीप टूले
दौंड : दौंडच्या पूर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव या भागातील वनक्षेत्रातील वनजमिनीतून बेकायदा वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन सुरू होते. या प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंडचे वनपाल रवींद्र धनाजी मगर व वनरक्षक किरण कदम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबन केले आहे. पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी याबाबत माहिती दिली.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव या गावांमधील भीमा नदीच्या पट्ट्यातील वन विभागाच्या वनक्षेत्रात तसेच उजनी संपादित केलेल्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून बेकायदा वृक्षतोड सुरू होती. तर राजेगाव, वाटलूज, नायगाव या भागात दहा ते पंधरा बेकायदा कोळसा भट्ट्या सुरू होत्या. याबाबत मलठण ग्रामस्थांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र, दौंड तालुका वनपरिक्षेत्राधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह या भागातील वनपाल व वनरक्षक यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यानंतर मलठण ग्रामस्थांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची लेखी तक्रार मलठण ग्रामस्थांनी पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची त्वरित दखल घेत आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी बुधवारी (ता. ७) तालुक्यातील मलठण, राजेगाव, नायगाव, वाटलूज या भागातील वनक्षेत्राला भेट दिली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत या परिसराची पाहणी केली. या भागातील वन विभागाच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून वनक्षेत्राचे मोठे नुकसान केल्याचे या वेळी निदर्शनास आले होते. तर काही ठिकाणी बेकायदा कोळसा भट्ट्या तसेच बेकायदा माती उत्खनन केल्याचे पाहणी दरम्यान आढळले होते. वरिष्ठ वन अधिकारी पवार यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
त्यानुसार पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी शुक्रवारी (ता. ९) दौंड वनपरिक्षेत्रातील दौंड परिमंडळातील राजेगाव नियतक्षेत्रातील राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलूज या गावातील राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोडी अंदाजे क्षेत्र ५.५५१ हेक्टर आणि माती उत्खनन २३१३ घ.मी. झाले आहे. दौंड वनपाल रवींद्र मगर व राजेगावचे वनरक्षक किरण कदम यांचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामावर तसेच वनसंरक्षणावर नियंत्रण नाही.
या प्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. चौकशीमध्ये अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे. यासाठी दौंड वनपाल रवींद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांचे निलंबन करण्यात येत आहे, असा आदेश देण्यात आला आहे.