पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. पांडे यांची महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्य आणि चौफेर संघटनशैलीने महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पांडे यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने त्यांची महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समाजमाध्यमावर (एक्सवर) पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्य ठेवणारे पुणे येथील प्रा. श्री. राजेश पांडे यांची महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती करताना मला अतिशय आनंद होत आहे.
श्री. पांडे यांची चौफेर संघटनशैली असून त्यांचा लाभ पक्षाला नेहमी… pic.twitter.com/pBzJXFsvLV— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 24, 2024
राजेश पांडे हे गेल्या 40 वर्षापासून संघ परिवारात सक्रिय असून दहा वर्ष पूर्ण वेळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे. अलीकडच्या काळात भाजप उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. मेरी माती मेरा देश, हर घर तिरंगा असे अभियान त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहचवत गिनीज रेकॉर्ड पूर्ण केले. याशिवाय जी२० परिषद, अयोध्या दर्शन अभियान असे अनेक संघटन उपक्रम त्यांनी पूर्ण ताकदीने यशस्वीपणे राज्यभर अमलात आणले. पुणे पुस्तक महोत्सवाचे ते आयोजक आणि संयोजक असून आतापर्यंत ७ गिनीज रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.
“विधानसभा निवडणुका सुरु झालेल्या आहेत. पक्षाच्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे संघटनेचे संपूर्ण लक्ष्य भाजप आणि महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येण्यासाठीच्या नियोजनावर आहे. निवडणुकीसाठी बूथ रचना, सरकारच्या लोककल्याणकरी योजना लोकांपर्यंत पोहचवणे यावर सध्या काम सुरु आहे.”
राजेश पांडे, महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश, भाजपा