बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारती जवळून जाणारा सासवड- सुपा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी टोकदार खडी भरली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील पिसर्वे, नायगाव, राजुरी, रिसेपिसे, भोसलेवाडी, पारगाव या गावांमधून येणारे शेतकरी, विद्यार्थी यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करवा लागत आहे. तर बांधकाम विभागाने कोरडी ,टोकदार खडी भरून रस्ता दुरुस्त करण्याची नवीनच एक स्थिती निर्माण केली आहे.
पूर्व भागातील गावासाठी महत्वपूर्ण रस्त्यावर पिसर्वे, पारगाव, कुंभारवळण,अंबेओहोळ पर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील साईड पट्टी पूर्ण खचून गेली आहे. तसेच मध्यभागी देखील रस्ता खचला आहे, त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. विद्यार्थी, शेतमाल घेऊन येणारे शेतकरी तसेच तीर्थक्षेत्राकडे जाणारे भाविक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
एवढच नाही तर वाहनांचे टायर फुटून दुर्घटना घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे? आता तरी याकडे लक्ष दिले जाईल का? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
सासवडच्या पूर्वेला सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामासाठी कुंभार वळण परिसरातून मोठ्या प्रमाणात गौण खजिनाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दूरदर्शा झाली आहे. हे खरे असले तरी इतरही रस्ता खूप धोकादायक झाला आहे. त्यामुळे निकृष्ट कामाची चर्चा आहे. शासकीय यंत्रणा प्रश्न मार्गी का लावत नाही? असा शेतकरी व प्रवाशांचा सवाल आहे. खचलेल्या रस्त्यात कोरडी टोकदार खडी टाकून बुजवण्याचा प्रयोग जो केला जात असून प्रवाशांच्या जीवावर ते बेतत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत.