राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी हातभट्टींवर छापा टाकण्याचे सत्र सुरुच आहे. यवत येथील दोन हातभट्टीचालकांवर कारवाई केल्यानंतर पिंपळगाव येथे खुटबाव-पिंपळगाव रस्त्यावरील आवाळे वस्ती येथील हातभट्टी बनवत असलेल्या ठिकाणी यवत पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ५८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेसन अशोक नानावत हा विषारी गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, एका चारचाकीमध्ये (क्र. एम.एच. १२ ए.एफ. २९७८) ५ प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये सुमारे १७५ लीटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण १ लाख ५८ हजार ७५० रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
याबाबत पोलीस हवालदार अक्षय यादव यांच्या फिर्यादीवरून आरोपी बिसम अशोक नानावत (वय ३५, रा. २२ फाटा केडगाव) याच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इंगवले करत आहेत.