पुणे : राष्ट्रवादीचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक पुण्यातील पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत बोलवली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवली आहे.
या बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होत आहे. शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत देखील चर्चा सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी या विषयावर भाष्य केले आहे.
शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत सुरु आहे, असे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.