पुणे: शहरातील रिक्षाचालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रस्त्यावर व्यवसाय करीत असताना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पँट असा गणवेश परिधान करणे तसेच गळ्यात ओळखपत्र घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे पालन न केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
प्रवासातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रिक्षाचालकांची ओळख पटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा पुरवताना गणवेश तसेच ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील रिक्षाचालक सेवा पुरवताना या नियमाचे पालन करताना दिसत नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी यासंदर्भात एक पत्र नुकतेच काढले आहे. त्यात रिक्षाचालकाने रिक्षा सेवा पुरवताना गणवेश आणि ओळखपत्र परिधान केलेले नसल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
तपासणीसाठी विशेष पथक तैनात
यासाठी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षांची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तपासणीसाठी विशेष पथके तैनात केली जाणार असून रिक्षाचालकांचा गणवेश, ओळखपत्र आणि त्यांच्या वैध कागदपत्रांची तपासणी या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. तसेच कोणी नियमभंग केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.